अकोला जिल्हा
- अकोला जिल्हा
- भूवर्णन
- आर्थिक स्थिती
- लोक व समाजजीवन
अकोला जिल्हा
- महाराष्ट्राच्या विदर्भ भागातील जिल्हा. उ. अक्षांश १९°५१ ते २१°१६' व पू. रेखांश ७६° ३८' ते ७७° ४४'. क्षेत्रफळ १०,५९६ चौ. किमी.; लोकसंख्या १५,००,४६८ (१९७१).
- याच्या पश्चिमेस बुलढाणा, उत्तरेस अमरावती, पूर्वेस अमरावती व यवतमाळ आणि दक्षिणेस परभणी व यवतमाळ जिल्हे आहेत.
- ह्या जिल्ह्यात उत्तरेस आकोट, मध्यभागी बाळापूर, अकोला व मुर्तिजापूर आणि दक्षिण भागात वाशिम व मंगळूरपीर असे सहा तालुके आहेत. जिल्ह्याची दक्षिणोत्तर लांबी १४५ किमी. व पूर्व- पश्चिम सरासरी रुंदी ७२ किमी. आहे. महाराष्ट्राच्या ३·४६ टक्के क्षेत्रफळ व ३ टक्के लोकसंख्या या जिल्ह्यात आहे.
भूवर्णन
- उत्तरेला पूर्व-पश्चिम पसरलेल्या सातपुडा पर्वताच्या रांगांना ‘गाविलगडचे डोंगर’ आणि त्यांच्या दक्षिणेस सु. ८० किमी. पसरलेल्या पूर्णा खोऱ्याच्या सपाट प्रदेशास (समुद्रसपाटीहून सरासरी ३०० मी. उंच) ‘ पयानघाट ’ असे म्हणतात.
- त्याच्या दक्षिणेस अजिंठ्याच्या डोंगराची पूर्व-पश्चिम रांग असून त्यापलीकडील दक्षिणेचा भागही उंचवट्याचा पण सपाट आहे. या सर्व भागास (समुद्र- सपाटीहून सरासरी ५०० मी. उंच )‘ बालाघाट ’असे नाव आहे. जिल्ह्यात चुनखडीखेरीज इतर कोणतेही खनिज सापडत नाही. भौगोलिक क्षेत्राच्या सु. ८·३ टक्के क्षेत्र जंगलव्याप्त आहे.
- पूर्णा ही या जिल्ह्यातील प्रमुख नदी अमरावती जिल्ह्यातून वहात येते. ती मुर्तिजापूर, अकोला व बाळापूर या तालुक्यांच्या उत्तर व आकोट तालुक्याच्या दक्षिण सीमेवरून पश्चिमेकडे बुलढाणा जिल्ह्यात जाते. हिला उत्तरेकडून शहानूर व विद्रुपा आणि दक्षिणेकडून पेंढी, उमा, काटेपूर्णा , लोणार, मोर्णा, निर्गुणा व मान या उपनद्या मिळतात.
- पूर्णेच्या उत्तर व दक्षिण दोन्ही किनाऱ्यांवर एकूण २ ४ ते ३२ किमी. रुंदीचा पट्टा खाऱ्या पाण्याचा आहे. पैनगंगा ही दुसरी महत्त्वाची नदी बुलढाणा जिल्ह्यातून वाशिम तालुक्यात प्रवेश करते. पैनगंगेचे या जिल्ह्यातील खोरे पूर्णेच्या खोऱ्याहून लहान आहे. अडाणा, अरुणावती व पूस या तिच्या उपनद्या होत.
- समुद्रापासून बराच आत व समुद्रसपाटीपासून कमी उंच (सरासरी ४००मी.) यामुळे या जिल्ह्याचे हवामान विषम आहे. तपमान उन्हाळ्यात २६° ते ४९° से. तर हिवाळ्यात ७ ° से. असते. वाशिम व मंगरूळपीर हे पठारावरील तालुके त्या मानाने थंड आहेत. पावसाची वार्षिक सरासरी ८० सेंमी. असून हे प्रमाण उत्तरेकडे कमी होत जाते. बहुतेक सर्व पाऊस वेळेवर पडत असल्याने या जिल्ह्यात दुष्काळाची फारशी भीती नाही
आर्थिक स्थिती
- सर्व जमीन लाव्हा रसाच्या दगडापासून तयार झाली असून ती चांगली सुपीक आहे. पठारावरील जमिनी पयानघाटातील जमिनींच्या मानाने उथळ व कमी कसाच्या आहेत. लोकसंख्येच्या ८१·३ टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. पेरणीचे निव्वळ क्षेत्र ७४·७ टक्के (१९६४-६५), यापैकी फक्त ०·७ टक्के क्षेत्र ओलित आहे.
अंदाजे ९० टक्के पीक खरीप हंगामातील असून कापूस, ज्वारी, कडधान्ये, गहू व भुईमूग ही येथील मुख्य पिके होत. १९६४-६५ मध्ये अन्नधान्यापैकी ३०·४%ज्वारी, ११·६% डाळी व ७·२% गहू असून इतर पिकांत ४२·२०% कापूस होता.
आकोटच्या आसमंतातील भाग आंबे व वऱ्हाडी विड्याची पाने यांकरिता विशेष प्रसिद्ध आहे. लिंबू, केळी, पपई, संत्री, जांब, बोर, व द्राक्षे ही फळे या जिल्ह्यात होतात. याशिवाय तेल काढण्याचे कारखाने व तेलघाणे, साबणाचे कारखाने, तुरीपासून डाळ तयार करणे, लाकूडकामाचे कारखाने, कापडाच्या गिरण्या असे अनेक छोटेमोठे उद्योग ह्या जिल्ह्यात आहेत. १९६५ मध्ये जिल्ह्यात नोंद झालेल्या ९५ फॅक्टरी असून त्यांत रोज सरासरीने ६,४०९ कामगार काम करीत होते. कारंजा येथे मोठी घड्याळे बनविण्याचा कारखाना आहे. लोकसंख्येच्या २·५६ टक्के लोक निर्मिती – उद्योगधंद्यात गुंतले आहेत (१९६१).
विणकाम हे कुटीरोद्योग जिल्ह्यात सर्वत्र असला तरी आकोट, वाशिम व बाळापूर या शहरी तो प्रामुख्याने दिसून येतो. यात हातमागाचे कापड, लुगडी, लुंग्या, सतरंज्या इ. वस्तू विणल्या जातात. आकोट व बाळापूर येथील सतरंज्या विशेष प्रसिद्ध आहेत. कापसाची सरकी काढणे व गठ्ठे बांधणे यांचे कारखाने सर्व तालुक्यांच्या शहरी व कारंजा, पातूर, माळेगाव या ठिकाणीही आहेत.
दोन कापड गिरण्या व एक वनस्पती तुपाचा कारखाना असे फक्त तीन मोठे उद्यागधंदे या जिल्ह्यात असून ते सर्व अकोला शहरातच आहेत. अकोल्याच्या पश्चिमेस २९ किमी. अंतरावरील पारस येथे महाराष्ट्रातील तिसऱ्या क्रमांकाचे औष्णिक वीजउत्पादन-केंद्र आहे. कापूस व धान्याचा व्यापार जिल्ह्यात सर्वत्र असला, तरी धान्याकरिता अकोला व रिसोड प्रसिद्ध असून कापसाकरिता अकोला, आकोट, वाशिम, कारंजा तर पानांकरिता आकोट प्रसिद्ध आहे. बैलांच्या बाजाराकरिता मुर्तिजापूर तालुक्यातील उंबर्डा प्रसिद्ध आहे.
- मध्य रेल्वेचे ३५४·७७ किमी. लांबीचे मार्ग या जिल्ह्यात आहेत. हे प्रमाण दर १००चौ. किमी. ला १·४६ किमी. असे पडते.
- मुंबई-नागपूर व हिंगोली-खांडवा हे मध्य रेल्वेचे दोन महत्वाचे फाटे अकोल्यावरून जातात. यवतमाळ-अचलपूर ही छोटी रेल्वेलाईन मुर्तिजापूरवरून जाते. सडकांची लांबी ११६१·६२ किमी. (१९६६) असून त्यापैकी ५१२·९६ किमी. डांबरी आहेत. मुंबई-कलकत्ता राष्ट्रीय राजमार्ग बाळापूर, अकोला, मुर्तिजापूर या शहरांवरून जातो. तालुक्याच्या सर्व शहरांशी व शेजारील जिल्ह्यांच्या मुख्य ठिकाणांशी अकोला शहर सडकांनी जोडलेले आहे.
लोक व समाजजीवन
- १९६१-७१ या कालात या जिल्ह्याची लोकसंख्या २६·१६ टक्क्यांनी वाढली आहे. एकूण ९ शहरे व १,५०७ खेडी असून २३·५५ टक्के लोक शहरांत व ७६·४५ टक्के लोक खेड्यांत राहतात (१९७१). प्रत्येक शहरात नगरपालिका आहे. १९७१ मधील साक्षरता ३९·९ टक्के असून ७९ टक्के लोक मराठी भाषा बोलतात.
- १९७१ मध्ये जिल्ह्यात १,४३४ प्राथमिक, १०५ माध्यमिक व २५ उच्च आणि विविध शिक्षण देणाऱ्या संस्था होत्या. जिल्ह्यात चार मोठी रुग्णालये असून एकूण ७५६ खाटांची सोय होती. लोकसंख्येत स्त्रियांचे पुरुषांशी दर हजारी प्रमाण ९८२ (१९७१) आहे.
- लोकवस्तीचे सरासरी प्रमाण १९७१ मध्ये दर चौ. किमी.ला १४२ असून अकोला व आकोट तालुक्यांत हे प्रमाण सर्वांत जास्त व मंगरूळ तालुक्यात ते सर्वात कमी आहे. आकोट तालुक्याच्या उत्तरेकडील डोंगराळ भागात गोंड, कोरकू व वंजारी या वन्य जमाती राहतात.
- गाविलगडच्या डोंगरातील नरनाळा या प्रेक्षणीय किल्ल्याचा (९६४ मी. उंची) तट २२ किमी. घेराचा असून त्यात ६७ बुरुज व २१ लहानमोठे दरवाजे आहेत. आत पाण्याची १९ टाकी आहेत. बाळापूर येथे नदीतीरावर १० मी. उंचीची आणि २४ खांब व ५ घुमट असलेली नक्षीदार छत्री आहे.
- पातूर येथील दोन विहार, वाशिम येथील बालाजीचे मंदिर, कारंजा येथील जैन देवालये तसेच नरसिंह सरस्वतीचे मंदिर व बार्शीटाकळी येथील हेमाडपंथी देवालये या भागाच्या पुरातन वैभवाची साक्ष देतात. शिरपूर ही जैनांची काशी मानली जाते, तर सेवा भाया या संताची कर्मभूमी असलेले पोहरादेवी हे मंगरूळपीर तालुक्यातील गाव वंजारी जमातीची काशी समजली जाते.
0 टिप्पण्या