भारतातील खिलाफत चळवळ
- भारतातील खिलाफत चळवळ : पहिल्या महायुद्धाच्या शेवटी १९१८–२२ च्या कालखंडात तुर्की साम्राज्याचे तुकडे करून सुलतानाची सत्ता संपुष्टात आणण्याचा विचार विजयी दोस्त राष्ट्रांनी केला; त्याविरुद्ध भारतात चळवळ झाली.
- खिलाफत म्हणजे खलीफाची धार्मिक व राजकीय सत्ता. तुर्कस्तानचा सुलतान हा सर्व मुस्लिम जगाचा वरिष्ठ धर्माधिकारी म्हणून अनेक शतके मानला जात होता.
- १९१४ साली सुरू झालेल्या पहिल्या जागतिक महायुद्धात तुर्कस्तान दोस्त राष्ट्रांच्या विरुद्ध उभा होता. या युद्धात जर्मनीबरोबर तुर्कस्तानचाही पराभव झाला. कॉन्स्टँटिनोपल, आशिया मायनर, थ्रेस इ. प्रदेश दोस्तांनी व्यापले; तुर्की साम्राज्य कोसळण्याच्या परिस्थितीत होते. विजयी ब्रिटन व फ्रान्स यांनी खलीफा तुर्की सुलतान याच्या साम्राज्याचे तुकडे पाडून ते आपल्या अखत्यारीखाली घेतले.
- दोस्त राष्ट्रे खिलाफत बरखास्त करणार अशी स्थिती उत्पन्न झाली. पहिल्या महायुद्धात मुसलमानांसह सर्व भारतीयांनी भाग घ्यावा, म्हणून भारतीय मुसलमानांना ब्रिटिशांनी त्यांच्या धार्मिक श्रद्धास्थानांचे महत्त्व कायम ठेवले जाईल, असे आश्वासन दिले होते. परंतु विजयानंतर या गोष्टीचा साहजिकच विसर पडला.
- तुर्की खिलाफत नष्ट होत आहे आणि ब्रिटिश सत्ताधारी त्यास कारणीभूत होत आहेत, हे पाहून ब्रिटिशांनी खिलाफत सावरावी, नष्ट होऊ देऊ नये, म्हणून भारतातील मुस्लिम समाजाने गांधीजींच्या नेतृत्वाखाली खिलाफत चळवळ सुरू करण्याचा निश्चय केला.
- जानेवारीच्या १९ तारखेला डॉ. अन्सारी यांच्या नेतृत्वाखाली व्हाइसरॉयना मुसलमानांचे शिष्टमंडळ भेटले. खिलाफतीचे धार्मिक व राजकीय अस्तित्व अबाधित राखणे हा इस्लाम धर्माचा प्राण आहे, असे त्यांनी निवेदन दिले. व्हाइसरॉयनी त्यांना निराशाजनक उत्तर दिले.
- मौलाना महंमद अली एक शिष्टमंडळ घेऊन इंग्लंडला गेले व त्यांनी लॉइड जॉर्ज यांची मुलाखत ता. १७ मार्च १९२० रोजी घेतली. लॉइड जॉर्ज यांनी उत्तरात म्हटले, की जी तत्त्वे ख्रिस्ती धर्मियांना लागू आहेत तीच मुसलमान धर्मियांना आम्ही लागू करू. तुर्कस्तानला आपली सत्ता जे देश त्याचे नाहीत, त्यांवर चालविता येणार नाही. ह्या उत्तराने शिष्टमंडळ नाराज झाले. त्यांनी १९ मार्च हा सुतकाचा दिवस पाळला.
- नंतर काही दिवसांनी सु. १८,००० मुसलमानांनी ब्रिटिश भूमीत आपण राहणार नाही, अशा निश्चयाने हिजरत करण्याचे ठरविले. ते अफगाणिस्तानात निघाले. पण अफगाणांनी त्यांना आपल्या देशात येण्यास मनाई केली. मुसलमानांना आता गांधींशिवाय आधारच उरला नाही. त्यांच्या खिलाफत परिषदेत ते जोरदार ठराव व त्याहीपेक्षा जोरदार भाषणे करीत.
- असहकारितेची चळवळ फोफावत होती. हिंदुमुस्लिम ऐक्याकरिता गांधी धडपडत होते. त्यांनी असहकारितेच्या चळवळीला खिलाफत चळवळीची जोड दिली.
- पण हिंदुमुसलमान ऐक्याला दंगलींनी तडेही जात होते. मलबार, पंजाब, बंगालमध्ये १९२१ व १९२२ मध्ये जातीय दंगे झाले. मलबारमध्ये मोपलांनी बंड केले. १० नोव्हेंबर १९२२ रोजी लोझॅन येथे दोस्तांची परिषद भरली. दोन महिने चर्चा चालली. त्याच वेळी मुस्ताफा केमाल अतातुर्कच्या निधर्मी नेतृत्वाखाली अंगोरा सरकारने कॉन्स्टँटिनोपल शहराचा ताबा घेतला व तुर्कस्तानचा सुलतान आपला जीव वाचविण्याकरिता ब्रिटिश जहाजातून माल्टाला गुप्तपणे पळून गेला. त्याला १९२३ मध्ये पदच्युत करण्यात आले व त्याचाच पुतण्या गादीवर बसला. सुलतानाची जागा रद्द झाली व नवी व्यक्ती खलीफा म्हणून आली. तुर्कस्तानमध्ये निधर्मी प्रजासत्ताक राज्य आल्यामुळे खलीफाची जागा १९२४ साली खालसा करण्यात आली. त्यामुळे खिलाफत चळवळ आपोआप विराम पावली.
0 टिप्पण्या