कृष्णा नदी
कृष्णा नदी
- दक्षिण भारतातील गोदावरी आणि कावेरी यांदरम्यानची प्रमुख नदी. लांबी सु. १,२८० किमी.; जलवाहन क्षेत्र सु. २,५२,४०० चौ. किमी.
- कृष्णेचा उगम सह्याद्रीच्या रांगेतील धोम महाबळेश्वराच्या १,४३८ मी. उंचीच्या डोंगरात १७०५९’ उ. व ७३० ३८’ पू. येथे सु. १,२२० मी. उंचीवर होतो. येथून पश्चिमेस अरबी समुद्र फक्त सु. ६५ किमी. दूर आहे. क्षेत्र महाबळेश्वर येथे कृष्णा, वेण्णा, कोयना, गायत्री व सावित्री या नद्यांचे उगमझरे दाखवितात.
- या नद्या महाबळेश्वराहून वेगवेगळ्या दिशांनी वाहत जातात. त्यांना मूळ पाणीपुरवठा फक्त मोसमी पावसापासूनच होतो. महाबळेश्वर येथे दरवर्षी सु. ६२५ सेंमी. हून अधिक पाऊस पडतो त्याच्या पूर्वेस सु. २० किमी. पाचगणी येथे सु. २२५ सेंमी., तर ३२ किमी. वरील वाई येथे फक्त ६० ते ७५ सेंमी. पडतो. महाबळेश्वर डोंगराच्या उत्तरेकडून खाली येऊन कृष्णा आग्नेय व पूर्व दिशांनी वाहू लागते. सु. १० किमी. वरील धोम येथे धरण बांधले जात आहे.
- वाई खोऱ्याला समृद्ध करीत कृष्णा वाईच्या आग्नेयीस ३७ किमी. वर असलेल्या माहुलीस येते. येथे कृष्णेला वेण्णा नदी मिळते. येथून कृष्णा दक्षिणवाहिनी होते. माहुलीपासून ५० किमी. कराड येथे कृष्णा आणि कोयना यांचा प्रीतिसंगम आहे. महाबळेश्वरहून पश्चिमेस उतरून मग दक्षिणेकडे वाहणाऱ्या कोयनेवर कोयनानगर येथे प्रचंड धरण बांधून त्याचे पाणी बोगद्यातून पश्चिमेकडे नेऊन खाली डोंगरातूनच पोफळी येथील वीजघरात नेले आहे.
- कराडपासून वर कृष्णेवर खोडशी येथे बंधारा आहे. त्याच्या जोडीला कोयनेचेही पाणी शेतीला उपलब्ध होईल. सांगलीजवळ कृष्णेला पश्चिमेकडून वारणा व पूर्वेकडून येरळा ह्या नद्या मिळतात. कुरुंदवाड येथे कोल्हापूराकडून आलेली पंचगंगा नदी कृष्णेला मिळते; तेथेच नदीच्या दुसऱ्या काठावर श्री क्षेत्र नृसिंहवाडी हे दत्ताचे जागृत देवस्थान आहे. कासारी, कुंभी, तुळशी, भोगावती व सरस्वती यांमिळून पंचगंगा झाली आहे. भोगावतीवर राधानगरी येथे विद्युत् प्रकल्प उभारला आहे. यानंतर कृष्णेला दूधगंगा नदी मिळते व ती कर्नाटकाच्या हद्दीत शिरते.
- महाराष्ट्राच्या सातारा व सांगली जिल्ह्यांतून कृष्णा सु. ३०० किमी. वाहते. तिचे पात्र विशेषतः रहिमतपूर पर्यंत खोल व खडकाळ असले, तरी तिचे ३० — ३५ किमी. रुंदीचे खोरे अत्यंत सुपीक काळ्या मातीचे आहे.
- त्यात ज्वारी, बाजरी, भुईमूग, करडई, कडधान्ये, बटाटा, आले, हळद, मिरची, ऊस, तंबाखू, थोडा तांदूळ ही पिके होतात. वांगी, कांदे, लसूण, धने, चिंच, आंबा, पेरू व इतर अनेक फळे, फळभाज्या व पालेभाज्या होतात. येथील सकस गवतावर व वैरणीवर पोसलेली जनावरे धष्टपुष्ट, चपळ व देखणी आहेत.
- खिलार ही बैलांची जात विशेष प्रसिद्ध आहे. उगमाकडील प्रदेशात उन्हाळ्यात कित्येकदा नदी जवळजवळ कोरडी होते. तिला आणि तिच्या उपनद्यांना बंधारे व धरणे बांधून व विहिरींची जोड देऊन शेतीला पाणीपुरवठा व कारखान्यांना वीजपुरवठा करण्याचे प्रयत्न चालू आहेत. तिची उत्तरेकडील प्रमुख उपनदी भीमा तिला महाराष्ट्राबाहेर मिळत असली, तरी ती महाराष्ट्राच्या सातारा, पुणे, अहमदनगर, सोलापूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांतून अनेक नद्यांचे पाणी तिला आणून देते.
0 टिप्पण्या